" पासवर्ड "

(आदी ची आई )

आदी ची आई : काय फालतुगिरी आहे यार... कळतंच नाही की कसं वागायचं आदि बरोबर. असं वाटतं की आपण केलेले संस्कार गेले कुठे? लहानपणी तर असा नव्हता हा. माझ्याशी सगळं बोलायचा, शेअर करायचा आणि आता काहीच शेअर नाही करत तो माझ्याबरोबर. असा तर नव्हता अगं आदी. कळतंच नाही की कसं वागायचं आम्ही , म्हणजे हा नीट वागेल आमच्याशी. 

हे संवाद बऱ्याच वेळेला आपल्याला ऐकायला मिळतात. मुलं लहान असतात तेंव्हा ते आई बाबा बरोबर सगळं शेअर करतात. असं म्हणतात की जनरेशन गॅप मुळे हे वादविवाद होतात. मला असं वाटतं की हे वादविवाद होतात कारण आपण आपल्या मुलांमधल्या बदलला ला स्वीकारू शकत नाही. लहान असताना आपल्या मुलाने कुठलीही मस्ती केली तरी आपण त्यांना स्वीकारायचो कारण ते निरागस होते. आपल्यामध्ये संवाद असायचा, कारण त्यांना आपण मुक्त पणे  स्वीकारायचो. मुलांनाही वाटायचं की कधी एकदा शाळा सुटते आणि घरी जाऊन मी आज काय काय घडलं ते आई बाबा बरोबर शेअर करतोय. छोट्यातली छोटी गोष्ट सुध्दा ते आपल्याला येऊन सांगायचे. जनरेशन गॅप तेंव्हा होतीच की, मगं मोठे झाल्यावर असे काय घडलं की आपल्यापासून गोष्टी लपवायला त्यांना " पासवर्ड " ठेवायला लागला. विचार केला तर असं वाटतं की आपली मुलं लहान असताना,  समाजाला काय वाटेल ह्याचा विचार आपण केला नाही पण तेच ती मोठी झाल्यावर त्यांचा विचार कमी आणि समाजाचा विचार जास्त करत गेलो. आपणच आपल्या संस्करांवर अविश्वास दाखवला. समाजाल काय वाटेल ह्याच्या पेक्षा जास्त महत्वाचं की आपल्या मुलाला/ मुलीला काय वाटतंय. लहानपणी शाळेत असताना जर मुलं येऊन म्हणाल की मला एक मुलगी / मुलगा आवडतो तर आपण त्यांची मस्करी उडवायचो, त्यांचा सहज स्वीकार करायचो. कदाचित ह्याच मुळे तेंव्हा ती आपल्याशी येऊन बोलायचे पण मोठी झाल्यावर त्यांना बोलावसच वाटत नाही. कारण मोठी झाल्यावर त्यांना आपले आई बाबा सुध्दा समाजाचा एक भाग वाटायला लागतात. शिक्षण क्षेत्रात काम करताना बऱ्याच वेळेला हा अनुभव आला, " मुलं म्हणतात की आई बाबा ना प्लीज काही सांगू नका, ते नाही समजणार ". 
जेंव्हा मुलं म्हणतात की, " ते नाही समजणार किंव्हा त्यांना नाही कळणार " तिथेच त्यांनी  " पासवर्ड " शोधायला सुरवात केलेली असते. एकदा विचार करून बघुया की आपण त्यांच्या वयाचे असताना, ह्या सगळ्यातून गेलेले होतो. कधीतरी आपल्याला पण ह्याच फिलिंग आलेल्या. मनाच्या एका कोपऱ्यात आपण ठरवलेलं असतं की मी माझ्या मुलांच्या वेळी असं नाही वागणार. अचानक त्या कोपऱ्याला आपण भविष्यासाठी " पासवर्ड " लावून बंद करून ठेवतो. फक्त एवढंच की त्या मनातल्या कोपऱ्याचा " पासवर्ड " आता टाकायची वेळ आली आहे , तरच आपल्याला आपल्या मुलांचा " पासवर्ड " बनता येईल आणि  त्यांच्या मनातल्या सगळ्या फाईल्स आपल्याला वाचता येतील. 

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials