" दत्तक "

आदी ची आई : अरे तुला माहितेय का, आपल्या आदीच्या वर्गात ती परी आहे ना तिला म्हणे दत्तक घेतलाय.
आदी चे बाबा : ओके, तुला कसं कळलं? 
आदी ची आई: तिच्या शेजारीच माझ्या मैत्रिणीची बहीण राहते. तिच्याकडून कळलं. 
.....तेवढ्यात आदी आत येतो...
आई दत्तक म्हणजे काय? 
काही नाही रे आदी दत्तक म्हणजे जी मुलं अनाथ आश्रमात असतात ना त्यांना दुसरे आई बाबा आपल्या घरी राहायला घेऊन जातात त्यांना दत्तक म्हणतात. बरं तू जाऊन झोप आता, उद्या शाळा आहे ना..
ओके म्हणत आदी झोपायला जातो. 
दुसऱ्यादिवशी शाळेत जायची तयारी सुरू असते, पण आदी च्या मनातून " दत्तक " हे काही गेलेलं नसतं आणि तो लगेच ठरवतो की शाळेत जाऊन पहिल्यांदा परी ला विचारायचं.

तो शाळेत जातो आणि लगेच परी ला विचारतो की तुला दत्तक घेतलाय का ग? तुला अनाथ आश्रमातून आणलाय का ग? माझी आई म्हणाली की जी मुलं अनाथ आश्रमात असतात त्यांना दुसरे आई बाबा आपल्या घरी राहायला घेऊन जातात. 

परी ला काय बोलायचं ते सुचत नाही. ती गप्प बसते आणि फक्त एवढंच म्हणते आईला विचारून सांगते.. पण मनामध्ये खूप जास्त दुखावलेली असते. ती शाळा सुटल्यावर घरी जाते आणि आई ला विचारते की आई मला नक्की कुठून आणलाय. तो आदी विचारत होता. तो म्हणाला की मला अनाथ आश्रमातून आणलाय म्हणून... सांग ना आई... तूच माझी आई आणि तोच माझा बाबा आहे ना मग आदी असं का म्हणाला??

तिच्या आई च्या पायाखालची जमीन सरकते. परीच्या आईला  काय बोलाव ते सुचतच नाही. 
एकदा तिला वाटत की ती वेळ आली की परी ला सगळं खरं सांगावं आणि एकदा मनात भीती वाटते की जर खर कळलं आणि मला सोडून गेली तर, मला आई म्हणून स्वीकारलं नाही तर? तिला काहीच सुचत नाही. 

अशा प्रसंगांना तोंड देणं सोप्पं नाहीये. ज्यांना त्यातून जावं लागत त्यांच्या मनातली चलबिचल आपण नाही समजू शकतं. 
दत्तक घेणं काही गुन्हा नाहीये. हे पण एक पुण्याचं काम आहे. मुलं ही देवाघरची फुलं असं आपण म्हणतो ना आणि त्यांचा सांभाळ करतो. मगं त्या फुलांमध्ये भेदभाव कशाला. मगं तो भेदभाव मुलगा मुलगी मधला असेल किंव्हा स्वतःच आणि दत्तक घेतलेलं मुलं ह्यातला असेल. 
जेंव्हा एखादी आई बाळ दत्तक घेते तेंव्हा तिच्या मनात पण तेच विचार असतात जे एका गरोदर स्त्री मध्ये असतात, की मी बाळाची काळजी घेऊ शकेन की नाही? 
त्या बाळाला काय काय शिकवायचे , कसे वाढवायचे ,त्या बाळाला कधी ही काही पण कमी पडू द्यायचं नाही असं सगळं त्या दोघींनी पण ठरवलेलं असतं. त्यामुळे आई ची माया ही दोघींची सारखीच, म्हणून तर कृष्ण भगवान् आठवले की यशोदा मैया आठवते आणि शिवाजी महाराज आठवले की जिजाऊ आठवते...
अहो आणि जिथे स्वतः दत्त आहेत दत्तक ह्या संकल्पनेत ते चुकीचं कसं असेल. 

समाजाला बदलणं कठीण आहे कारण प्रत्येक जण एक स्वभाव आणि विचार घेऊन जन्माला येतो. पण जर का आपल्या मुलांचा दत्तक ह्या संकल्पनेकडे बघण्याचा दृष्टीकोन आपण बदलवला तर कदाचित कुठलाच आदी कधी कुठल्याही परी ला जाऊन असं विचारणार नाही. 

#NehaP

*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही. सहज मनातलं... 
नावं हे फक्त त्या संवादा साठी आहेत. 

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials