आई, बाबा आणि भांडण

 " काय रे आदि , काय झालं? तू इतका disturb का झालास? भांडण झालंय का कोणाबरोबर? 
"  अरे बोल बाळा ." 
(नंतर जे आदि ने मला सांगितलं , ते ऐकल्यावर मला आदि चं खुपचं वाईट वाटलं. ) 
आदि च्या घरी त्याच्या आई बाबांचं भांडण झालं होतं आणि त्यामुळे आदि प्रचंड मानसिक दृष्ट्या त्रासलेला होता. 
काही जणांना वाटतं की, ह्यात नवीन काहीच नाही हे तर घरोघरी घडतं असतं.
आपण मोठी माणसं काही वेळाने भांडण विसरून जातो आणि वेगळ्या कामात व्यस्त होऊन जातो. वयानुसार आणि अनुभवामुळे आपल्याला हे बदल स्वीकारणे सोप्पे होते. पण लहान मुलांचं तसं नसतं... त्यांचं वय लहान असतं आणि अनुभवाने सुध्दा ते लहान असतात त्यामुळे त्यांना हे बदल स्वीकारणं कठीण होतं.. अहो लहान मुलं ती , आपण जसे अनुभवातून शिकत मोठे झालो अगदी तसचं त्यांचं आहे. पण आपण हे विसरतो की त्या भांडणाचा त्या लहान मुलांच्या मनावर किती परिणाम होतो ते...  
भांडण सुरू झालं तर आपला राग आपण मुलांवर काढतो. त्यांची चूक नसताना त्यांच्यावर आपण ओरडतो, फटके देतो.
बरं ह्या सगळ्यात मुलांची चूक काय?
 
नीट विचार करा, एका आई च्या पोटी जन्माला येणारी जुळी मुलं सुध्दा विचारांनी आणि स्वभावानी वेगवेगळी असतात.. मग इकडे तर आई बाबा (म्हणजे आपण )  दोन वेगळ्या घरातून आलेलं आहोत. आपले विचार , स्वभाव हे वेगळे निश्चितच असणार. त्यामुळे घरात " भांडण " होणे हे स्वाभाविक आहे. मुलांच्या समोर कधी ना कधीतरी भांडण हे होणारच कारण आपण एका कुटुंब पद्धतीत राहतो. जिथे आई बाबा आणि मुलं हे त्या कुटुंब पद्धतीचे घटक आहेत. फक्त एवढंच की आपल्याला ते भांडण सकारात्मक दृषटीकोनातून मुलांच्या समोर मांडता आलं पाहिजे. 

सकारात्मक दृष्ट्या भांडण म्हणजे, आपल्याला मुलांना हे समजावून सांगायचे आहे की भांडण हे काही वाईट नाही जर त्याचा आपल्या नात्यावर परिणाम होत नसेल तर. भांडण म्हणजे विचारांमधले मतभेद होय. जशी तुम्हां लहान मुलांमध्ये खेळताना भांडणं होतात की नाही पण म्हणून तुम्ही मैत्री तोडता का? उलट थोड्यावेळात परत एकत्र खेळायला सुरवात करता. मोठ्यांच पण अगदी तसचं असतं. आई बाबांचे पण मतभेद होतात आणि तो राग ते भांडणातून व्यक्त करतात.  पण ह्याचा अर्थ असा नाही की आई किंवा बाबा वाईट आहेत. फक्त त्या एका दिवशी आमचे विचार पटले नाहीत. आणि हो कधीकधी तू कसं आपल्या मित्रा बरोबर किंवा मैत्रीणी बरोबर ४-५ दिवस बोलत नाहीस. अगदी तसचं आई बाबा पण कधीकधी ४-५ दिवस बोलत नाहीत कारण त्या ४-५ दिवसांमध्ये ते एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न करतात. कारण कुठल्याही परस्थितीत आपण एकमेकांचा आधार आहोत आणि त्यामुळेच आपण एकमेकांना समजून घेतले पाहिजे. 

आणि सध्याच्या काळात भांडणांची ही सकारात्मक बाजू पण तेवढीच महत्त्वाची आहे.. कारण कदाचित मुलांना नीट व्यक्त होता येणार नाही, त्यांना आई बाबांच्या भांडणांचा किती त्रास होतो हेही नीट सांगता येणार नाही पण त्यांच्या चिडचिड करण्यातून आणि त्यांच्या वागण्यातून आपल्याला बदल जाणवायला लागतो. आणि ही मुलं आई किंवा बाबांबद्दल  विचार करायला लागतात की जन्मापासून जे माझे आई बाबा कधीच चुकीचे नव्हते ते अचानक असे चुकीचे  का वागायला लागले? 

हेच आपल्याला मुलांना नीट समजावून देता आलं पाहिजे. कारण कितीही झालं तरी आई बाबा आणि मुलं ही एक टीम आहे. आणि त्यांना अख्ख्या आयुष्याची इनिंग खेळायची आहे. 

#NehaP

*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही. 
 

Comments

Popular posts from this blog

मोठ्ठा शून्य

The Millennials