आलोय तुमचा निरोप घ्यायला..

अथिती देवो भव.. ही म्हण तुमच्या जगात आहे. निश्चितच मला अशी वागणूक मिळणारच नव्हती. कारण बीनबुलाये मेहमानाच तुम्ही माणसं किती मनापासून स्वागत करता याबद्दल पण ऐकलंय.... मी तर सगळ्यात नावडता पाहुणा. 

तुम्ही सगळ्यांनी माझा शोध घेतला. माझ्या विषयी जाणून घेतलं. मी तुमच्या जवळपास पण येऊ नये म्हणून तुम्ही खूप काळजी घेतलीत. माझ्याबद्दल अपशब्द पण उच्चारले. 
" काळजी करू नका, मला त्याचा राग नाही आला. मी मान्य करतो की मी चुकलो. 

खरंतर तुम्हाला जवळून बघितल्यावर असं जाणवलं की तुम्ही इतकेही वाईट नाही. काहीजणांनी माझ्यासाठी  कविता रचल्या, गाणी गायली. माझ्यासाठी अगदी मंत्र , आरत्या पण रचल्या. तर काहीजणांनी माझ्यावर विनोद केले, माझी चेष्टा केली. 

माझ्या जाण्यासाठी जेवढे जमतील तेवढे उपाय केलेत. तुम्हाला मी दिसत नाही याचाही राग आला, पण काय करणार मला रूपच असे दिले. म्हणूनच आता निरोप घ्यायला आलोय कारण मला माहिती आहे, एक दिवस तुम्ही मला नष्ट करण्यात यशस्वी होणार आहात.

तुम्ही मान्य करा किंवा नका करू माझ्या येण्याने तुमच्या जीवनशैलीत भरपूर फरक पडला. अहो लहान मुलं तर किती खुश झालेत कारण त्यांना तुमचा सहवास मिळाला. ज्या घरासाठी तुम्ही कष्ट घेता ते घर आज तुम्हाला सुखाने अनुभवायला मिळालं. पण माझ्या भीतीने तुम्हाला ते सुख दिसलेच नाही तुम्हाला दिसला फक्त तो पिंजरा, जणूकाही मी तुम्हाला त्याच्यात कोंडून ठेवलं.  

अहो तुम्हाला तर तुमच्या घरातल्यांचा त्रास व्हायला लागला. तुमच्या घरातल्या कामाचा त्रास व्हायला लागला. कदाचित तुम्हाला जाणीव झाली असेल की तुमच्या घराची काळजी घेणारी ती व्यक्ती अर्थातच तुमची बायको किती कष्ट घेते. आज कदाचित माझ्यामुळे त्यांना तुमची मदत मिळाली आणि मला माहितीये की त्यांनी तुमचे आभारही मानले. 

अहो आता तरी त्यांना," तू काय घरातच असतेस बाहेर काम करून बघ मग कळेल" असं म्हणू नका. आणि हो घरातल्या स्त्रियांना ही कळलं असेल कि तुमच्या घरातली माणसं घर चालवण्यासाठी किती कष्ट घेतात ते... तुम्हाला एकमेकांचे रोल समजून द्यायलाच मी कदाचित आलो असेन. 

माझ्यामुळे ज्या घरातल्यांना वाईट दिवस बघावे लागले त्यांची मी क्षमा मागतो, मला माफ करा. एक लक्षात घ्या तुमचे वाईट विचारच तुमच्या सुखाचे क्षण हिरावून घेतात. असं म्हणतात की संकट वेळीच तुम्हाला तुमची खरी माणसं ओळखता येतात. काही जणांनी माझ येणं सकारात्मक दृष्टिकोनातून घेतलं. त्यांनी ह्या संधीचा भरपूर उपयोग करून घेतला. स्वतः मधले कलागुण ओळखले. रोज स्वतः मधल्या नवीन बदलाला ओळखण्याचा प्रयत्न केला. 

अहो बाहेर प्रेम शोधण्यापेक्षा, आनंद शोधण्यापेक्षा तुमच्या जवळच्या माणसांमध्ये तो आनंद शोधण्याचा प्रयत्न करा. कारण कितीही झालं तरी तुम्ही कष्ट हे तुमच्या घरातल्यांसाठी घेताय ना? कित्येक लहान मुलांनी ह्या संधीचा फायदा घेऊन त्यांच्या आई-वडिलांबरोबर कौटुंबिक खेळ खेळले. कोणी गाणी गायली तर कोणी एकत्र नृत्य केलं. काही जणांनी वेगवेगळे चॅलेंजेस खेळले.

कधी कधी तुम्ही हे मान्यही केलंत की असा वेळ परत आता मिळणार नाही. कारण वेळ ही एक अशी गोष्ट आहे ती सतत बदलत असते. कधीकधी चांगली वेळ येते तर कधीकधी वाईट वेळ येते. वेळ चांगली असो किंवा वाईट तुम्ही तुमच्यातली माणुसकी सोडू नका कारण कितीही झालं तरी तुमचं जीवन हे तुमच्या विचारांवरती अवलंबून आहे. 

लॉ ऑफ अट्रॅक्शन ह्याचा विचार केलात तर तुम्हाला कळेल की तुम्हीच एक मोठी सुट्टी मागितली होती. अहो देवाने तर फक्त तथास्तु म्हटलं आणि तुम्हाला सुट्टी दिली पण ती तुम्ही नकारात्मक दृष्ट्या बघितली. अहो तुम्ही घरी असताना निसर्गाने खूप बदल घडवून आणले. पुस्तकात शोधायला लागणारे पक्षी प्राणी तुम्हाला तुमच्या आजूबाजूला दिसायला लागले कारण त्यांना माझ्या येण्याने मोकळीक मिळाली. तुम्ही तुमचे हक्क मागू तरी शकता पण ते बिचारे मुके प्राणी पक्षी त्यांचा हक्क कोणाकडे मागणार? कदाचित ह्यावेळी देवाने त्यांचं ऐकलं.     

जर तुम्ही नियमांचं पालन केलं असतं तर  मी एवढे दिवस पाहुणा म्हणून राहिलो नसतो खूप आधीच निघून गेलो असतो.. पण आता मात्र माझ्या जाण्याची वेळ परत आली आहे. एखादी जवळची व्यक्ती गेली की आपल्याला त्या व्यक्तीची किंमत कळते. तुमचा ऑफिस, तुमचा रोजचा दिनक्रम परत सुरू होईल सुद्धा पण त्यावेळी मी असताना घालवलेल्या क्षणांचा विसर पडू देऊ नका. मुलांना तुमच्या खऱ्या प्रेमाची गरज आहे, तुमच्या वेळेची गरज आहे ह्याचा विसर पडू देऊ नका. ज्या घरासाठी एवढे कष्ट घेताय त्या घराचा आनंद घ्यायला विसरू नका. तुम्हाला सुद्धा छंद जोपासता येतात आणि त्या छंदातून आनंद मिळवता येतो हे विसरू नका.

आणि हो ज्या निसर्गाने तुम्हाला बनवले त्या निसर्गाची काळजी घ्यायला विसरू नका. चला तर मग मी आता निरोप घेतो कारण मला सुद्धा हळूहळू निघायची तयारी करायची आहे. 
तुमचा हा पाहुणा (म्हणजे बिनबुलाये मेहमान) खूप दिवस राहिला त्याबद्दल क्षमस्व. जमलं तर पुढील आयुष्यात मी असतानाचे सुंदर क्षण आठवण्याचा प्रयत्न करा....

तुमचाच नावडता 
कोरोना...
#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials