गुरु - सगुण रुपात
गुरु - सगुण रुपात की निर्गुण रुपात?
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर आपल्याला उणीव भासते ती एका अश्या व्यक्तीची जी आपल्याला कुठल्याही परिस्थितीत धीर देईल. एक अशी व्यक्ती जिच्यावर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवतो आणि निश्चिंत होतो.. एक अशी व्यक्ती जी आपल्याला मार्गदर्शन करेल...
बरं ही उणीव अगदी लहान असल्यापासून आपल्याला भासते. उदाहरण द्यायचं झालं तर लहानपणी आपल्याला आई बाबांच्या ओरडण्यापासून वाचविणारे काका काकू असतील किंवा आजी आजोबा असतील किंवा ताई दादा असेल. आपल्याला ती व्यक्ती जणू काही एक आधारस्तंभ वाटायला लागतो.
शाळेमध्ये आपले मित्रमैत्रिणी आपले आधारस्तंभ होतात. तसं बघितलं तर प्रत्येक टप्प्यात आपल्याला आधाराची गरज असते. मगं अश्या एक किंवा अनेक व्यक्ती असतील. जसजसं आपण मोठे होतं जातो तसतसं आपण अनुभव घेत, व्यक्तींचे अनुभवांच्या अनुषंगाने द्विभाजन करत जातो.
मनुष्याचे संपूर्ण आयुष्य नेमका खरा गुरू कोण हे ओळखण्यात जातो. गुरू ची परिभाषा, त्यांचं वर्णन म्हणजे केशरी रंगाचा पोशाख, रुद्राक्षाच्या माळा, मस्तकी भस्म किंवा अंगारा आणि नेहमीच सकारात्मकतेने मार्गदर्शन करणारे अशी व्यक्ती किंवा भविष्य सांगणारे गुरुजी, मठाधिपती, अडचणींच्या काळात मंत्र पूजा करून त्यातून बाहेर काढणारे म्हणजे आपले गुरू अशी एक कल्पना मनात असते. बहुतांश लोकं, "चांगलं" भविष्य ऐकण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जा जोपासण्यासाठी गुरूंचा शोध घेते.
गुरू - अंधारातून प्रकाशाकडे नेणारा गुरुच आहे. सकंद पुराणानुसार गुरुचे सात प्रकार आहेत. (i) सुचक गुरू – जे आपल्याला शाळा आणि संस्थांमध्ये वेगवेगळे विषय शिकवतात (ii) वाचक गुरू – जो वक्तृत्व करतो आणि देव कोण आहे यावर मार्गदर्शन करतो (iii) बौद्ध गुरू – जे तुम्हाला अध्यात्मवाद आणि संबंधित पद्धतींबद्दल मार्गदर्शन करतात – (iv) निशिध गुरु – जे तुम्हाला इतरांना हानी पोहोचवण्याच्या काळ्या तंत्राच्या युक्त्या शिकवतात, ज्ञानी पुरुष अशा प्रकारचे गुरू टाळतात (v) विहित गुरु – जो तुम्हाला अध्यात्मवादाचा प्रवास कसा सुरू करावा याबद्दल मार्गदर्शन करतो (vi) कर्णख्य गुरू – जो तुम्हाला बाकीचे सोडून संन्यासी बनण्यास प्रोत्साहित करतो. (vi) परम गुरु - जो शक्तीमार्गाने तुमचे भय दूर करतो आणि तुम्हाला जीवन आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त करतो. गतजन्मांच्या गुणांमुळे परमगुरू प्राप्त होतो, अन्यथा नाही.
(ही माहिती Google वरून मिळाली.)
गुरू आणि सद्गुरू हे सगुण रुपात असतील किंवा निर्गुण रुपात असतील. त्यांची शिकवण आपल्याला योग्य दिशा निवडायला मदत करते. खऱ्या गुरूंची तुलना कधीच होऊ शकत नाही. गुरूंची दोन्ही रूपं, एका विशिष्ठ आणि प्रचंड ऊर्जेचे स्रोत आहेत. असं म्हणतात की पृथ्वीतलावर सगुण रुपातला गुरू तुम्हाला मोक्ष प्राप्तीसाठी, सत्कर्मासाठी मार्गदर्शन करतो. पदोपदी, काय बरोबर - काय चूक ह्याचा प्रत्यय आणून देतो. निर्गुण रुपात गुरूंची ऊर्जा, शक्ती अनुभवायला मिळते. ती शक्ती कधी कुठलं रूपं घेईल हे सांगता येतं नाही. आणि ती शक्ती आपल्याला अडचणीतून बाहेर काढे पर्यंत आपल्याबरोबरच असते. गुरू आहे म्हणून अडचण येणार नाही असं होणार नाही, प्रारब्ध स्वतः देवाला मुकल नाही, आपण तर माणसं आहोत. गुरूंच्या येण्याने आपल्याला खूप संकटं येतात कारण आपल्या भोग भोगण्याचा वेग गुरू वाढवतो आणि लवकर त्यातून सुटका करतो. कारण गुरू आपल्या शरीराचे नाही तर आपल्या आत्म्याची प्रारब्ध पुढील सगळ्या जन्मासाठी संपवतो. योग्य मार्गावर आपण चालावे यासाठी सतत चांगल्या - वाईट व्यक्तींना, गोष्टींना आपल्या आयुष्यातून बाहेर काढतो.
गुरू सगुण किंवा निर्गुण रुपात असतील, त्यांची शिकवण ही आपल्या अंतःकरणात रुजू झालेली असते. प्रत्येक कृती घेताना आपल्या अंतःकरणातून येणार आवाज म्हणजे सगुण आणि निर्गुण गुरूंच रूप आहे कारण तो आवाज काय चूक काय बरोबर हे सतत सांगत असतो. बाहेर शोध घेताना मनातल्या गुरूंना वंदन करून निवेदन केले तर योग्य गुरू लवकरच मिळेल. गुरुकृपा लाभणे म्हणजे जन्ममृत्यू च्या कुलुपाची गुरुकिल्ली मिळणे होय.
#NehaP
Comments
Post a Comment