संवाद - पिढ्यांचा

संवाद, एका मनाचा दुसऱ्या मनाशी.... किंवा आधुनिक पिढीचा पूर्वीच्या पिढीशी.... 
आता म्हणाल हे काय नवीनच आहे बुआ... आम्ही नाही हो कधी असा संवाद केला आमच्या पूर्वजांबरोबर ....

बरोबर आहे तुम्ही तो संवाद केला नाहीत म्हणून आमच्या (आधुनिक) पिढीला करायला लागतोय.... अहो कारणच तसं आहे. बरं एक कारण असेल तर ठीक , इथे भरपूर कारणं आहेत. तुम्हाला आधुनिक पिढीचे विचार आवडतं नाहीत, त्यातून आधुनिक काळातल्या मुलींचे विचार तर नक्कीच खटकतात. आत्ताच्या मुलींचे राहणीमान, त्यांचं बेधडक मनाला येईल ते बोलणं, जिथे चूक आहे तिथे स्पष्ट बोलणं ह्या सगळ्या गोष्टी तर फारच खटकतात.. 

आता मला सांगा तुमची पिढी (पूर्वीची) जुन्या रुढी परंपरा पाळणारी.  त्यातून तुमच्या पिढीमध्ये पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रभाव जास्त होता. तुमची पिढी ते सगळं सहन पण करायची. आणि त्याचा आदर आमच्या पिढीला (आधुनिक) नक्कीच आहे. आपण जसं म्हणतो की मनावर हात ठेवून खर सांग, अगदी तसं तुम्ही खरंच मनावर हात ठेऊन सांगा की त्या काळी कधीच तुम्ही मनातल्या मनात तुम्हाला त्रास करून नाही घेतलात का? कधीच तुम्हाला असं नाही का वाटलं की माझ्या मुलांना मला पाहिजे तसं वाढवणार? कधीच नाही वाटलं की मी, माझा नवरा आणि आमची मुलं असं वेगळे राहणार? कधीच नाही का वाटलं की मला पाहिजे तसं आयुष्य मी जगणार? आणि खासकरून मुलींच्या आईला की, कधीच नाही का वाटलं की मी माझ्या मुलीबरोबर असं होऊ नाही देणार?

मला माहितेय बऱ्याचजणांची ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं "हो" असतील. काळानुरूप सगळ्या गोष्टी बदलतात हे जर मान्य आहे तर मुलींच्या विचारांमध्ये झालेला बदल का मान्य नाही? अहो तुमच्या पूर्वजांनी जी चूक केली तीच तुम्ही करताय... त्यावेळी नक्कीच तुम्हाला पण हेच प्रश्न पडले असतील पण पुरुषप्रधान संस्कृतीत नाही जमलं तुम्हाला... अहो सगळं मान्य की तुम्ही तुमची कर्तव्य केलीत, तुमचे संस्कार तसे होते... पण तुम्ही हे विसरलात की येणारी पुढची पिढी म्हणजे आम्ही आधुनिक विचारांचे असणार आहोत.  जर मानसशास्त्राचा नीट विचार केला तर तुम्हाला कळेल की आम्ही तुमच्या पोटात असताना तेच बघितलं. तुमच्या मनातल्या भावना की ते सगळं किती चुकीचं आहे आणि त्याबद्दल आवाज उठवला पाहिजे ही तुमच्या मनातली कळकळ आम्हाला तुमच्या पोटात असल्यामुळे जाणवली.... 

पण वाईट एवढंच वाटतं की, आमच्या पिढीतल्या आधुनिक विचारांना तुम्ही चुकीच्या दृष्टिकोनातून बघितलंत.. आणि त्यामुळे आमच्या पिढीतल्या मुलींचे विचार, आमचा स्पष्टपणा, मोठ्यांच्या चुकांवर बोलणं आणि बेधडक मनाला वाटेल तसं वागणं तुम्हाला खटकत राहिलं... नीट विचार केलात तर कळेल की आम्ही तुमचीच आधुनिक काळातली सावली आहोत... जिला स्वतःचं अस्तित्व आहे... आणि ते अस्तित्व आम्ही निर्माण केलंय.. 

हा संवाद साधणं खूप गरजेचं होतं कारण तुम्हाला आमची पिढी आधुनिक विचारांची वाटते तर आमच्या पुढची पिढी कशी असेल ह्याचा विचार करा. आणि आम्हाला आमच्या मनाप्रमाणे पाहिजे तसं जगुद्या.... आणि तुम्ही आमच्यावर केलेल्या संस्करांवर वरधीतरी विश्वास ठेवा...तरच असे संवाद साधण्याची वेळ नाही येणार.....  

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials