संस्कारांच ओझं - चांगले की वाईट ?

काल संध्याकाळी अचानक माझ्या मैत्रिणीचा फोन मला आला.. म्हणाली की "अगं मला माझ्या मुलांवराती चांगले संस्कार करायचेत. तुझ्या ओळखीत कुठे आहेत का ग संस्कार वर्ग? म्हणजे कसं त्याला योग्य वळणं मिळालंच पाहिजे."
" माझ्या ओळखीत असतील तर मी सांगते तुला ", असं म्हणून मी फोन ठेवून दिला...

मला एक क्षण सुचेनास झालं. एक मोठं ब्रम्हांड त्यामध्ये आपली पृथ्वी आणि त्या पृथ्वीवर राहणारी आपण माणसं.
पण माणसाला कोण घडवत तर त्याच्यावर होणारे संस्कार आणि आजूबाजूचा समाज... 

आपल्याकडे दोन भिन्न स्वभावाची माणसं आहेत... काहीजण समाज काय म्हणेल हा  विचार करून मुलांवरती संस्कार करतात तर काहीजण संस्कार करताना आवर्जून सांगतात की समाजाचा विचार करतं बसू नकोस... बरं म्हणजे दोनही 
स्वभावांची माणसं चुकीची होतात का? तर नाही... कारण त्या भिन्न स्वभावांच्या माणसांवर तसे संस्कार झालेले असतात..
निष्कर्ष काढायचा झाला तर, समाज सुध्दा संस्कारांमुळे बनतो..

संस्कार कधीच जबरदस्तीने होतं नाहीत. नीट विचार केला तर आपल्याला कळेल की पूर्वीच्या पिढी मध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये काय फरक आहे ते. पूर्वीच्या पिढीतल्या लोकांना जर विचारलं की, एखादी गोष्ट का करायची (उदाहरण - देव पूजा किंवा रुढी परंपरा ) तर बऱ्याच वेळेला त्यांचं उत्तर असतं की आम्ही कधी आमच्या आई वडिलांना हे विचारलं नाही त्यामुळे तूही विचारायचं नाहीस. गुपचूप जे सांगतेय ते करायचं... मान्य की ते केल्याने काही वाईट नाही होतं पण कुठल्याही रुढी परंपरा जबरदस्ती पाळायला लावणं किती चुकीचं आहे. हल्लीची पिढी वेगळ्या विचारांची आहे. पहिलं पटवून द्या की हे का करायचं तरच ही पिढी त्याचा विचार करणार.. काहीजण त्यांना practical म्हणतात तर काहीजण त्यांना आगावू म्हणतात.....

संस्कार हे मनावर होतात मग ते चांगले किंवा वाईट.... पण जबरदस्तीने केलेल्या संस्कारांच ओझं वाटायला लागतं. बरं  काही लोकांना वाटतं मान अपमान सांभाळलं, उलट उत्तर नाही दिलं म्हणजे ह्या मुलावर / मुलीवर चांगले संस्कार झालेत.. पण एखादी व्यक्ती जर मोठ्यांना त्यांच्या चुकांवराती बोलून दाखवत असेल तर त्या व्यक्तीवर किती चुकीचे संस्कार झालेत हे बोलून दाखवायला पण कमी नाही करतं. 

आता मला सांगा दुसऱ्यांचे संस्कार काढण ही काय चांगले संस्कार असण्याची पावती आहे का? असं वागणं तर सगळ्यात जास्त धोकादायक. आपण संस्कार आणि कर्तव्य ह्यांना नेहमीच एकत्र करतो.  आपली मुलं हेच तर बघत असतात...  त्यातून काहींना वाटतं की माझ्या मुलावर/मुलीवर मला पाहिजेत तसेच संस्कार झाले पाहिजेत... 
 
मला वाटतं की तुम्ही तुमच्या पध्दतीने संस्कार त्याच्या समोर मांडा.. प्रत्येक गोष्टीची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू त्यांच्या समोर ठेवा..आपल्याला जे योग्य वाटतं ते जरुरी नाही की त्यांना पण योग्य वाटेल. पण म्हणून जबरदस्ती त्यांच्यावर संस्कार लादण हे किती चुकीचं आहे. काहीजणांना पोथी वाचणं, श्लोक म्हणणं आवडतं पण जर काहींना नसेल आवडतं तर लगेच हे बोलणं काय संस्कार केलेत तुझ्यावर हे खुपचं जास्त चुकीचं आहे. लहान मुलं सगळ्या गोष्टी बघत असतात, तुम्ही तुमचं पोथी वाचन आणि श्लोक सुरू ठेवा त्यांना वाटलं तर ते तो संस्कार जोपसतील. काहींना माणूस पूजा करायला आवडत असेल त्यांनी ते करावं. 

आपण माणसं प्रत्येक गोष्टीत चॉईस आहे का ते बघतो मग तोच चॉईस संस्कारांच्या बाबतीत मुलांना का नाही ? स्वतः वर विश्वास ठेवला तर  मला खात्री आहे की आपली मुलं चांगलेच संस्कारच जोपासणार. 

अहो, मुलांना पण समाजातली माणसं आणि घरातली माणसं ह्यांच्यात फरक दिसू देना... आयुष्य जगताना समाजाचं ओझं वाहतो ते पुरेसं नाही का ? की संस्कारांच पण ओझं त्यांना द्यायचं... 

विचार नक्की करा... आणि त्यांच्यावरच संस्कारांच ओझं कमी करा... 

#NehaP

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials