गोरी गोरी पान फुलासारखी छान......

" काय झालं का गाणं म्हणून?" 

अहो मी तुम्हालाच विचारत आहे. शिर्षकच असं आहे की गोरी गोरी पान फुलासारखी छान दादा मला एक वहिनी आण.. हे गाणं आपोआप आपण गुणगुणारच. 

आपल्या घरातली अशी एक व्यक्ती जिच्या बद्दल आपल्याला लहानपणापासून ओढ निर्माण होते. मगं ती सख्खी वहिनी असेल किंवा चुलत मामे वहिनी , आपल्याला तिची चाहूल हवीहवीशी असते. कारण कुठेतरी आपण तिला मनातूनच बहीण मानलेल असतं. 

आपल्याकडे लग्नं ठरल्या दिवसापासून मुलींकडून अपेक्षांना सुरवात होते. ती कुणाचीतरी मामी होते, कुणाचीतरी काकू होते, कुणाचीतरी वहिनी, जाऊ होते.. अशी अनेक नाती तिला सांभाळायची असतात. खूप पूर्वीपासून ही परंपरा चालत आलेली आहे. बरं बाकीची नाती निभावताना तिला तिचं लग्नाआधीच्या आयुष्याची उणीव भासते.. तिला परत ते आयुष्य जगावस वाटतं.. कारण लग्नाआधी तिच्या आयुष्यात एक मोकळीक असते. 

पारंपरिक भाषेत बोलायचं झालं तर नणंद भावजया (वहिनी) ह्यांच्यावर भरपूर किस्से लिहिले जातात. आमची पिढी तर सरळ तिला तिच्या नावाने हाक मारते. मला वाटतं आपण आपल्या घरातल्या सगळ्याच व्यक्तींना बरोबर ओळखत असतो. पण वहिनीने जर का आपल्या घरातल्यांविरुद्ध काही शब्द उच्चारले तर आपण लगेच तिला नावं ठेवतो. 

आपले आई वडील म्हणून, भाऊ म्हणून आपल्याला त्यांच्याबद्दल दुसऱ्या कोणी अपशब्द वापरलेला नाही आवडत. नीट विचार केला तर आपल्याला पण आपल्या आई वडिलांच्या, नातेवाईकांच्या काहीतरी गोष्टी खटकतच असतात. मगं तिच्यावर राग धरून काय फायदा? 

अहो आपल्यासाठी ती नाती वेगळी असतात आणि वहिनी साठी वेगळी असतात.  तिचा विचार करून बघितला तर तिच्या मनाची तळमळ आपल्याला कळेल. कदाचित म्हणूनच आज तिच्यासाठी काहीतरी लिहावस वाटलं की, " तू या घरात सून म्हणून येणार आहेस, त्यामुळे माझं आणि तुझं नातं जरी वेगळं असलं तरी सुध्दा तू माझ्याशी सगळं बोलू शकतेस. अगं मलाच माझ्या आई वडिलांचे विचार कधीकधी  पटतं नाहीत तर जरुरी नाही की तुला पण पटतील.  

सगळ्यात महत्वाचं आई म्हणून मला वेगळे अनुभव आले असले म्हणजे जरुरी नाही की तुला सासू म्हणून सारखेच अनुभव येतील. तुला जर तिचा एखादा मुद्दा नाही पटला तर माझ्याशी बोल. कदाचित मी तुला वेगळा दृष्टिकोन दाखवू शकते. खरं सांगू का माझी आई बाबा दादा( तुझा नवरा ) 
ह्यांच्या काही गोष्टी मी दुर्लक्ष करत असेन पण म्हणून तू दुर्लक्षच करायच्या असं नाही. कारण अग तुला पण व्यक्तिस्वातंत्र्या आहे. तुझ्या विचाराचा पण मला आदर आहे. 

तू आमच्या घरात आलीस म्हणून तुला तुझे संस्कार सोडायची गरज नाही आणि स्वतःला जबरदस्ती त्या साच्यात घालू पण नकोस. कारण अग त्याचा जास्त त्रास तुला होईल. स्वतः च स्थान निर्माण करताना तू स्वतःला विसरू नकोस. तुझ्या आवडीनिवडी आम्हाला पूर्ण करायला सांग. 

अगं तू तुझ्या आई वडिलांना सोडून इथे राहायला येणारं आहेस, तुझ्या मनातली सप्न तू घेऊन येणारं आहेस. मगं ती आमची जबाबदारी आहे की तुझ्या स्वप्नांना आणि आमच्या स्वप्नांना एकत्रित पणे कसं छान अस्तित्वात आणायचं ते. 

एवढं लक्षात ठेव, समाज काय म्हणेल म्हणून ही नाती जबरदस्ती निभवू नकोस, कारण अग समाज आज आहे उद्या नाही पण आपल्याला एकत्र रहायचंय. जशी तुझ्या आईकडे तुझी बहिण तुझी हक्काची होती तशीच इथे तुझी ही बहीण (नणंद) हक्काची आहे. 

कारण कितीही झाल तरी फुलासारखी छान तू असताना, माझ्या नात्यातल्या प्रेमाची पण सावली तुला मिळायला हवी ना... 

तुझीच.....

खरंच जर का इतकं सुंदर नातं असेल तर त्या येणाऱ्या मुलीला फुलासारखं बहरता येईल. 
 

#NehaP
३/०७/२०२०

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials