शाळेत बाई आणि घरात आई

" हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे."

ही प्रार्थना आजच्या काळात आपण फक्त चित्रपटातून ऐकतो. पण ह्याचा खरा अर्थ आमच्या काळात आमच्या मनात रुजवला तो आमच्या शिक्षकांनी, गुरुजनांनी. आयुष्यात कुठल्याही पदावर तुम्ही असाल, जगाच्या पाठीवर कुठेही असाल पण पहिला प्रश्न आपण विचारतो ते म्हणजे ," तू कुठल्या शाळेत होतीस? " 

अहो, आपल्या शाळेतील एखादी व्यक्ती आपल्याला भेटली की जणू काही माहेरी गेल्यासारखं वाटतं.. आणि त्यातून तुमचे आई वडील जर शाळेत शिक्षक असतील तर मगं त्या माहेरच्या आठवणी अजूनच मनाला हलवून जातात.. 

आमच्या बाबतीत असाचं काहीसं झालं. आमची शाळा " पार्ले टिळक विद्यालय." विलेपार्ले मध्ये राहणं म्हणजे जुन्या आणि आधुनिक संस्कृतीला एकत्र हातात हात घालून चालण्यासारखे आहे. त्यातून तुम्ही पार्ले टिळक विद्यालयाचे जर विद्यार्थी असाल तर तुमचा रुबाब काही वेगळाच असतो... 

 " नावात काय आहे "  असं जरी शेक्सपियर म्हणाले तरी  "पार्ले टिळक विद्यालयाची विद्यार्थिनी " या नावात बरंच काही आहे...

२०२० ह्या वर्षावर जरी कोरोनाने हक्क गाजवला असला तरी सगळ्यात पहिला हक्क आमचा आहे. कारण आमच्या शाळेने यावर्षी शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. शंभराव्या वर्षाचं औचित्य साधून आज " घरात आई आणि शाळेत बाई " ह्या विषयावर लिहिण्याची संधी मिळाल्याबद्दल, मी अभूतपूर्व या मासिकाचे संपादक श्री. अनिल हर्डीकर ह्यांचे आभार मानते..

" आई " एक अशी व्यक्ती जिच्या प्रेमावर कित्येक कविता रचल्या गेल्या आहेत. आईच्या प्रेमाची तुलना कुठल्याच गोष्टींशी होऊ शकत नाही. कारण तिच्या प्रेमात फक्त माया आणि जिव्हाळा असतो. पण जेव्हा तिचं आई आपल्याला शाळेत शिक्षक म्हणून लाभते तेव्हा ती कधी प्रेमळ यशोदचं रूप धारण करेल आणि कधी शिस्तप्रिय जिजाऊंच रूप  धारण करेल हे सांगता यायचं नाही. 

आमची आई, श्रीमती इंदिरा परशुराम पटवर्धन म्हणजे नऊवारी साडी परिधान करणाऱ्या बाई म्हणून ओळखली जायची. आई जेव्हा लग्न होऊन पार्ल्यात राहायला आली तेव्हा तिचं फक्त त्या वेळेच्या तिसरी इयत्ते पर्यंत शिक्षण झाल होतं. शिक्षणाची ओढ असल्यामुळे लग्नानंतर तिने सातवी पर्यंत शिक्षण घेऊन मॅट्रिक पूर्ण केलं. " सप्तपदी चालताना जी साथ आपण देतो" अशी साथ खऱ्या आयुष्यात आपल्या जोडीदराकडून मिळणं पण किती महत्वाचं असतं ते आमच्या नानांनी ( म्हणजेच बाबांनी श्री. परशुराम दिनकर पटवर्धन PDP sir ) ह्यानीं दाखवलं. 

शाळेत ती शिस्तप्रिय शिक्षिका म्हणून प्रसिद्ध होती.  शाळेत शिकवण्याचा अनुभव नसताना सुध्दा तिला हे बाळकडू कुठून मिळालं हे नवलच. मी माझा भाऊ आणि माझी धाकटी बहीण असे तिघही एकाच शाळेत होतो. त्यामुळे आमची पालक शिक्षक भेट जणू रोजचं असायची. बरं आमची आई म्हणून तिने आमच्या चुकांवर कधीच पांघरूण घातलं नाही. उलट सगळ्यात जास्त शिस्तीचं वातावरण आम्ही अनुभवलं. 

माझ्या धाकट्या बहिणीला आई वर्गशिक्षिका म्हणून होती. एक अनुभव आठवतो म्हणजे तिच्या वर्गातल्या एका मैत्रिणीचा मस्ती मध्ये दात पडला. बाई वर्गात आल्यावर सगळ्यांनांच ओरडतील म्हणून त्यांनी माझ्या बहिणीच नाव पुढे केलं. पण शाळेत तिच्यातली आई बाजूला असायची आणि माझ्या बहिणीला खूप ओरडा पडला. तेव्हा बहीण काहीच म्हणाली नाही. घरी आल्यावर तिने खूप सांगण्याचा प्रयत्न केला. पण आपले विद्यार्थी खोटं बोलूच शकत नाहीत म्हणून तिचा विश्र्वासच बसत नव्हता. 
 
हा एक आणि असे अनेक अनुभव आहेत. मात्र वेळ आणि शब्द कमी पडतील. घरात सुध्दा तिची शिस्त खूप कडक असायची. कमी खर्चात संसार सुखाचा कसा करायचा हे शिकण्यासारखं होतं. शाळेत सुद्धा उपलब्ध असलेल्या गोष्टींमधून वार्षिकोत्सिवासाठी सजावट कशी करायची ते तिच्याकडून शिकण्यासारखं आहे. तिच्या त्याच गुणाची तिला संसार सुखाचा करताना मदत झाली. 

आईच्या विद्यार्थीनींनी जेव्हा शाळेत शिकवायला सुरवात केली तेव्हा त्यांच्यापुढे प्रश्न होता तो म्हणजे त्यांच्या मुलांना सांभाळणार कोण?  म्हणून आई ने त्यांच्या मुलांसाठी पाळणाघर सुरू केलं आणि त्यांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यास मदत केली.  आम्ही जरी तिची मुलं असलो तरीसुध्दा शिस्त पाळण हे आमच्या साठी बंधनकारक होतं. 

हस्तकला , हलव्याचे दागिने बनविणे,  शिवणकाम  ह्याची आवड असल्यामुळे आमचे आणि अगदी आमच्या मुलांचे शाळेचे गणवेष तिला जितकं वर्ष जमतील तितके वर्ष तिने शिवले. उन्हाळ्याच्या दिवसात आमच्या घरी हस्तकलेचे वर्ग भरायचे. तिच्यातली चिकाटी आणि इच्छाशक्ती ही कमाल होती आणि त्याचा प्रत्यय हा नेहमीच आम्हाला बघायला मिळाला. 

तसं तर खूप आहे तिच्याबद्दल लिहिण्यासारखं पण मी इथेच थांबते कारण कितीही झालं तरी माझ्या घरातल्या आईची आणि शाळेतल्या बाईची जागा आमच्या आयुष्यात कुणीच घेऊ शकत नाही. 

धन्यवाद
समस्त पटवर्धन भावंडं. 
भारती, शुभा आणि वसंत.....

शब्दांकन : नेहा पटवर्धन नवरंगे 


Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials