हक्क - महत्वाचा की नाही?🤔🤔

हक्क ही एक अशी गोष्ट आहे जी सगळ्यांनाच बजावयची असते. आपल्या भारतीय संस्कृतीत पहिल्यापासूनच हक्क ह्या गोष्टीला खूप महत्वाचं स्थान दिलं जातं. सगळ्यात जास्त महत्व तर खुर्चीवरच्या हक्काला आहे. मग ती खुर्ची राजकारणातली असुदे किंवा बस आणि ट्रेन मधली, ती ज्याला मिळाली ते नशीबवान असतात. बरं त्याच्यामुळे आजूबाजूच्या नात्यांवर काय परिणाम होतील त्याची शाश्वती नाही.. 

मात्र तोच हक्क तुम्ही एकमेकांवर बजावला तर त्याचे परिणाम खूपच वेगळे असू शकतात. प्रत्येक गोष्टीला जश्या सीमा असतात अगदी तश्याच प्रत्येक नात्यात सुध्दा असतात. मग ते नात बहीण भावांच असेल, मित्र मैत्रिणीच असेल, आई मुलांमधले असेल, बाबा - मुलांमधले असेल, सासू- जावई मधले असेल, सासू - सूनेतल असेल. 

 आपल्याला वाटतं की असं काही नसतं आणि घरातल्यांशी वागताना कुठल्याच सीमा नाही ठेऊ शकत. सत्य पचवणं आणि मानणं कठीण असतं ते हेच. एरवी आपण पूर्वजन्मी च्या गोष्टी करतो. प्रारब्धाच्या गोष्टी करतो ते मान्य असतं कारण आपल्याला सोयीस्कर वागण्याची सवय झालेली असते. 

जर का घराबाहेरच्या व्यक्ती बरोबर तुमचं खूप चांगलं पटतं असेल तर लगेच आपण म्हणतो, की गेल्याजन्मी काहीतरी नातं नक्कीच होतं म्हणून एवढं सख्य आहे. कदाचित नसेल पटतं तर आपण म्हणतो, की गेल्याजन्मात नक्कीच ह्याला त्रास दिलाय जो ह्या जन्मात फेडतोय... 

हे आपल्याला मान्य होतं पण जर घरातल्या व्यक्तीनं बरोबर असं घडत असेल तर ते आपण मान्य नाही करत, उलट जबरदस्ती हक्क गाजवयचा प्रयत्न करतो. आपल्याला एवढी भावंडं असतात पण एक अशी बहीण किंवा भाऊ असतो जो त्या सगळ्यांपेक्षा महत्वाचा असतो. ज्याला आपल्या आयुष्यात एक वेगळं स्थान दिलेलं असत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या नात्यात कुठल्याच सीमारेषा तुम्ही ओढत नाही. कारण तुम्ही दोघांनी एकमेकांचा हक्क मनापासून स्वीकारलेला असतो. 

तेच जर तुम्ही हक्क गाजवताय पण समोरच्या व्यक्तीला तो हक्क मान्य नसेल तर तुम्ही जबरदस्ती नाही करू शकत. मगं ते नातं घरातल्यांशी असेल किंवा बाहेरच्यांशी असेल. तो जर जबरदस्ती गाजवायचा प्रयत्न केला तर मग भांडण, वादविवाद, अपमान होणारच आहेत. 

आपण जी नात्यातली स्पेस म्हणतो ती हिचं. कुठल्याही नात्यात ती स्पेस, जागा (तो हक्क) जपण खूप गरजेचं आहे. त्या हक्काचा आदर करायला आपल्याला जमलं पाहिजे. तरच त्या नात्याचा आपण आनंद घेऊ शकतो. 

कारण शेवटी एखाद्या व्यक्तीची जागा दुसरी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीच घेऊ शकत नाही. लग्न झालाय म्हणून जशी तुमच्या आई बाबांची जागा दुसरे कोणी घेऊ नाही शकतं तसचं तो हक्क पण गाजवू नाही शकतं. तुमचं लग्न झाल पण आधी तुमचं प्रेम कुणा दुसऱ्यांवर असेल तरी सुद्धा तुमच्या लग्नं झालेल्या व्यक्तीला तुमच्या प्रियकराच्या जागी बसवण्याचा अट्टाहास सोडा कारण आपण शेवट पर्यंत तुलना करत बसणार. जे सगळ्यात जास्त धोकादायक आहे तुमच्या नवीन नात्यासाठी. जशी तुमच्या मनात तुमच्या प्रियकराची/प्रेयसीची एक जागा स्पेशल आहे तशीच ह्या नात्याची स्पेशल जागा बनवण्याचा प्रयत्न करा. कदाचित तुमचं नवीन नातं तुमच्या जुन्या नात्यापेक्षा खूप सुंदर होईल. 

कारण आपण त्या नात्याची जागा बदलली नाही तर नवीन नात्यासाठी स्पेशल जागा बनवली. काही हक्क , त्यांच्या आठवणी, त्यांची जागा आपण दुसऱ्या कुणाला देऊ शकत नाही. त्यामुळे जर त्या हक्काचा मान ठेवला आणि ती नात्यातली स्पेस जपली तर कदाचित कुठल्याच नात्याच ओझ नाही वाटणार. 

समाज काय म्हणेल म्हणून कधीच नात्यात खोटेपणा आणू नये असं वाटतं. प्रत्येकवेळी जरुरी नाही की तुम्ही त्या नात्यावर हक्क बजावलाच पाहिजे. खोटी नाती कधीच टिकू शकत नाहीत पण खरी नाती आयुष्यभर तुमच्या बरोबर असतील. 

कारण त्या नात्यातल्या हक्काला एक आदर असेल. 

#NehaP

*कुणालाही संबोधून म्हणायचं नाही..
😊🙏😊

Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials