अशी आई नको ग बाई !!

अशी आई नको ग बाई !!

"आई" हा एक शब्द खूप काही सांगून जातो. बाळाला जन्म देण्यासाठी सोसलेल्या कळांपासून ते मुलाला / मुलीला स्वतःच्या पायावर उभे करे पर्यंत घेतलेले कष्ट, आनंद,त्याग सगळंच.... 

लहानपणी आईशिवाय पान हलत नाही.. मुलांसाठी चांगलं जेवण बनवणं, खेळवण, चांगले संस्कार करणे, वाईट गोष्टींपासून दूर ठेवणे.. जसं जसं मुलं मोठी होतं जातात तसं तसं शाळेचा अभ्यास, पालकसभेला हाजिर राहणं.. आणि एवढं सगळं करून सुध्दा शाळेतून येणाऱ्या सूचना की मुलांकडे लक्ष द्या आणि बरच काही... अश्या अनेक गोष्टी आई सांभाळत असते. 

एकीकडे मुलांना शिस्त लावताना स्वतः वाईटपणा घेणं आणि दुसरीकडे घरातल्यांचे विचार मुलांना पटवून द्यायची तडजोड करणं.. घरात कोणाचीही भांडण झाली , अबोला धरला तर "आई" त्यांच्यातल्या संभाषणाचा दुवा असते. 

मुलं मोठी होत असताना ती तीच जगणं विसरून जाते... सगळं असून सुध्दा काहीच नसल्याच्या भावना तिला येतात.. पिढ्यांमधलं अंतर आणि विचार खूप जवळून अनुभवणारी, पण काही ठिकाणी हतबल असणारी व्यक्ती म्हणजे "आई". 

एक दिवस असा येतो, की जेव्हा आजूबाजूची लोकं म्हणायला लागतात," सोळावं वर्ष धोक्याच" , "नीट लक्ष ठेव", संगत बरोबर आहे ना? अश्या अनेक प्रश्नांना ती सामोरी जात असते पण त्या लोकांना काय माहित की दुसऱ्याबाजुला आई आणि वयात आलेल्या मुलाचं वेगळाच संघर्ष चालू असतो... 

आणि तो म्हणजे "अशी आई नको ग बाई" ह्या विचारांचा.... 

आई ने अनेक पावसाळे बघितलेले असतात म्हणून ती मुलांना सतत सूचना करत असते... आणि मुलं जगाच्या स्पर्धेत स्वतःला सिद्ध करण्यात धडपड करत असते. ह्या स्पर्धेत टिकण्यासाठी आई चे जूने सल्ले, तिच्या काळातले विचार काही उपयोगाचे नाही असा समज झालेला असतो. त्यामुळे आतापर्यंत सगळं समजणाऱ्या माझ्या आईला हे कळतच नाही अशी खात्री मुलांची होते आणि बाहेरच्या जगात आपल्याला समजून घेणाऱ्या मित्रमैत्रिणींना शोधायला सुरवात होते... 

मुलं मोठी झाली आता मी मोकळी हे म्हणणाऱ्या आई ला परत एक संघर्ष करावा लागतो.. "आई तुला नाही कळणार", "तू खूप जुन्या विचारांची आहेस", असे अनेक संवाद होतात..  

ना आई चुकीची असते आणि नाही मुलं... कारण दोघेही आपापल्या परीने प्रयत्न करत असतात स्वतःचा मुद्दा मांडण्याचा... दोघांच्याही मनात आणि डोळ्यात तेच भाव असतात.. 

वेळ हेच औषधं आहे, ह्याचा प्रत्यय काही वर्ष उलटल्यावर येतो... "अशी आई नको ग बाई" वरून कधी मन "मला जन्मोजन्मी तूच आई म्हणून तूच हवी " .  ह्या विचारावर येतं तेच कळतं नाही....  अचानक आपली आई परत आपल्यासाठी परफेक्ट "आई" होते.

#NehaP
 



Comments

Popular posts from this blog

गुरु - सगुण रुपात

भोलानाथ का रे वागलास असं?

दार उघडं बये दार उघडं....