अ. वि. उ. वि.
अ. वि. उ. वि
कितीही सरळ जायचं ठरवलं तरी "विचार" ही अशी गोष्ट आहे जी समोरच्याला द्विधा मनस्थितीत टाकते. सरळ जाणाऱ्याला वाकडी तिकडी वाट घ्यायला भाग पाडते.
"विचार" येताना एकटेच येतात. आपण त्याला विशेषण देतो, "अति विचार आणि"उगाच" विचार आणि सगळं बदलून जातं. प्रत्येकाच्या आयुष्यात असे प्रसंग येत असतात की एक छोटीशी गोष्ट असते पण आपण त्याला खूप मोठ् रूप देतो.
सगळेच विचार हे शुल्लक नसतात. काही विचार इतिहास घडवून गेले आहेत.
विचारांवर विजय मिळवणे हे प्रत्येकाला शक्य असते पण तो विजय मिळवताना वेळ किती लागेल हे स्वतः ला निश्चित करावे लागतो. लहान मुलं असुदे किंवा मोठी व्यक्ती असुदे, नेहमीच आपण ऐकत आलोय की उगाच विचार करत बसू नकोस. अति विचार करत बसू नकोस. बऱ्याच वेळेला आपली तंद्री लागलेली असते आणि तेवढ्यात कोणी तरी आपल्याला विचलित करते.
असं म्हणतात की माणसाचा मेंदू एका मिनिटात ३८-४५ विचार निर्माण करते म्हणजे दिवसभरात सुमारे ५००००-७०००० विचार. ( Google वर मिळालेला नंबर ) एवढं नक्की की आकडा खूप मोठा आहे. पण सगळ्याच विचारांकडे आपण लक्ष देत नाही. कधीकधी विचारांमध्ये आपल्या प्रश्नाची उत्तरे आपल्याला मिळतात तर कधी सुटलेली कोडी परत नवीन प्रश्न निर्माण करतात.
आपण विचार करताना दुसरे काय म्हणाले, नातेवाईक काय विचार करत असतील, माझ्या बद्दल विचार असतील का? इथंपासून ते अगदी डोक्याला आणि मेंदूला झिणझिण्या येईपर्यंत विचार करत असतो. जर कधी ठरवलं की सगळे विचार लिहून काढायचे तर आपल्याला जाणवेल की सुरवात आणि शेवट ह्या विचारांमध्ये काही साम्य नाही.
मुलं आईच्या गर्भात असताना, डॉक्टर चांगले विचार करा असं का म्हणतात त्याच महत्व मोठं झाल्यावर कळते. आजूबाजूची लोकं, वातावरण चांगल्या विचारांचे असणे खूप गरजेचे आहे. कारण तिथेच संस्कारांना सुरवात होते. एकदा मुलं जन्माला आले की घरातल्यांचे विचार तमुलांच्या विचारांना जोडले जातात. आणि त्यातून समाज घडत जातो.
सध्याच्या काळात तिशी नंतरच्या आणि पन्नाशी पर्यंतच्या पिढीतल्या विचारांचा जर अभ्यास केला तर खूप गोष्टी उलगडतील. कारण त्यांना जास्त अस्वस्थ करणारा विचार म्हणजे की ह्या विचारांमधून शांतता कशी मिळेल. काहींना थोडं थांबायचाय, काहींना भविष्यात जायचंय तर काहींना भूतकाळात जायचंय कारण प्रत्येकाला विचार आणि त्यामधून घेतलेले निर्णय पुन्हा बदलायचे आहेत, नव्याने अनुभवायचे आहेत.
मनुष्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मोक्ष त्याच्या कर्मांनुसार मिळतो असं म्हणतात. चांगले कर्म आपल्या विचारांवर अवलंबून आहेत. विचारांचं आचरण आपण कसं करतोय ते पण तेवढंच महत्त्वाचं आहे.
अति आणि उगाच विचार तर येतच राहणार, त्यांना योग्य दिशा देणं आणि त्या विचारांवरून योग्य कर्म करणे आवश्यक आहे. आपल्या आजूबाजूला सल्ले देणारे, उपदेश देणारे भरपूर आहेत. पण आपल्याला ऐकून घेणारे फार कमी आहेत आणि त्यामुळे विचार हे फक्त मनातच राहतात. आताच्या पिढीतल्या मुलांना जर त्यांच्या विचारांना योग्य दिशा आणि वळण देता आले तर नक्कीच सकारात्मक वातावरण निर्माण होईल. शिक्षकांकडून मिळालेले हे ज्ञान आज अनुभवायला मिळत आहे.
#NehaP
Comments
Post a Comment