मध्यांतर

मध्यांतर.... 

आज खूप दिवसांनी नाटक बघण्याचा योग आला. नाटक म्हटलं की त्यातली पात्र, त्यांचे संवाद आणि कथा ही महत्वाची असतात. कलाकार, जे त्या पात्रांना जिवंत करतात, ते त्या नाटकाची उंची एका वेगळ्याच पातळीवर नेऊन ठेवतात. 

पहिली घंटा वाजली.... नाट्यगृहात एक वेगळंच वातावरण होतं. सगळे जण आपापल्या जागेवर एका आशेने बसलेले, काही जण त्यांच्यात्यांचात संवाद साधत होते तर काही जण त्यांच्या लहान मुलांना पॉपकॉर्न, वेफर्स असं सगळं देऊन शांत करत होते. काही आजी आजोबा त्या इवल्याश्या प्रकाशात मोबाईल चा आवाज बंद करून द्या हो असं शेजारील व्यक्तींना सांगत होते. एकंदरीत तिसरी घंटा वाजण्याच्या आधीची गडबड , उत्साह, उत्सुकता असं वातावरण होतं आणि तेवढ्यात, कलाकारांना बघण्याची संधी सोड्याची नाही म्हणून साधारण २-३ इंच असलेल्या मानेला अजून किती उंच नेऊ शकतो असा प्रयत्न करणाऱ्या काही व्यक्ती त्यांचा प्रयत्न करत होत्या. अखेर नाटक सुरू झालं.... 

वेळ आली ती मध्यांतराची... नाटक, चित्रपट बघण्यामागच एक कारण मध्यंतरात तिथे जाऊन समोसा, वडापाव आणि पॉपकॉर्न खाणं हे पण असतंच. सगळे जण पटापट बाहेर कॅन्टीन जवळ गेले. इतकी लोकं म्हंटल्यावर रांगेत उभ राहणं तर होतंच.. 

आणि त्याच वेळी तिकडे काही मैत्रिणींचा ग्रुप उभा होता. साधारण ३५-४० वयातल्या असतील. त्यांचं एक वेगळंच संभाषण चालू होतं. त्यांच्या एका मैत्रिणीच लग्न ठरलेलं आणि लग्नाआधी केळवणासाठी त्या सगळ्या जमल्या होत्या.. ऐकून मस्त वाटलं की, ही कल्पना किती सुंदर आहे... केळवणाची... तेवढ्यात एक मैत्रीण तिला लग्न संस्थे बद्दल मत द्यायला लागली.... 

हल्ली घटस्फोटाचे प्रमाण खूप आहे. तू पहिल्या दिवसापासून जशी आहेस तशी वाग, उगाच स्वतःला बदलवू नकोस आणि असेच अजून सल्ले दिले जात होते. त्या लग्न ठरलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर इतके हावभाव बदलत होते की जणू नाटकातलं पात्र परत समोर आल्या सारखे झाले. 

मी जुळवून घेऊ शकत नाहीं म्हणून मी लग्न करणार नाही,
पगार माझ्यापेक्षा कमी आहे म्हणून मी लग्न करणार नाही, आमच्या स्वातंत्र्यावर गदा येईल म्हणून मी लग्न करणार नाही, समोरच्यांचे नखरे सांभाळायला मला वेळ आणि इच्छा नाही म्हणून मी लग्न करणार नाही असे अनेक मुद्दे दहा पैकी ५ -६ घरात रोज ऐकायला येतील. नक्कीच ही भिती मनात असते. 

काही पालक लग्न का करावं, तर तुझं लग्न झालं म्हणजे आम्ही मोकळे... अशी संकल्पना जर मुलांसमोर ठेवत असतील तर आजच्या मुलांना पगार इतके आहेत आणि सोयी सुविधा इतक्या आहेत की जीवनसाथी पेक्षा companion
(सहचर) का हवा/ हवी हेच माहित नाहीये. ... मग त्या मुलीला किंवा मुलाला काय वाटतंय हे कमिवेळा विचारत घेतलं जातं. कधीकधी आपल्या आधीच्या पिढीच कौतुक आणि नवल दोन्ही वाटत की, त्यांच्या लग्नाला २५-३० वर्ष झाली तरी त्यांचं जमत नाही, भांडण चालूच असतात, एकमेकांच्या घरण्याचा उद्धार चालूच असतो पण तेच जेव्हा त्यांच्या मुलांच्या लग्नाची वेळ येते तेव्हा असे काही सल्ले देतात की जणू त्यांच्यासारखा लग्नातला समंजसपणा आज पर्यंत कोणीही दाखवला नसेल.  
सत्य परिस्थिती समोर ठेवणं किती महत्वाचं आहे. मध्यंतरी एका मुलीचा मला फोन आला की, ताई मी जर आता नोकरी सोडली तर त्याने मला कमी पगाराच्या मुलांची स्थळ येतील का? ( सत्य घटना) तिकडे मला असं जाणवलं की लग्नाची व्याख्याच बदलून गेली आहे. 

असो, तर आमच्या पिढीत जी भिती आहे लग्नसंस्थेला घेऊन ती जर दूर करायची असेल, तर जसं नाटकातल्या तीन घंटा असतात तसेच लग्नाची पहिली काही वर्षे ही कधी गोड कधी तिखट असतील, सकाळी जर भांडण झाले तर रात्री झोपण्यापूर्वी ती मिटवायची, एकमेकांशी आधी जुळवून घ्यायची तयारी करायची.. थोडा त्रास होईल पण तेवढंच नात घट्ट होतं जाईल.. तुमचं जुळल की मग घरातल्यानाशी जुळवायला एकमेकांना मदत करा... कारण एकमेकांची बाजू मांडणं आपल्याला सोप्पं होतं. ..  

नंतर जी घंटा वाजते ती म्हणजे तुम्हाला मुलं हवंय नकोय त्याची.... हवं असेल तर मुलांच्या पुढे एकमेकांना विसरू नका. नवीन येणाऱ्या चांगल्या प्रसंगाना आणि आव्हानांना एकत्रपणे सामोरे जा.... राग, द्वेष, चिडचिड हे सगळं होईल पण समतोल साधण्याचा प्रयत्न करा..... 

आत्तापर्यंत एकमेकांची इतकी सवय होते की त्या सवयीचा कंटाळा येतो आणि कधीकधी वेगळे होण्याचे विचार मनात येतात...असे विचार येऊ शकतात किंवा येणार पण नाही... जर आले तर एकत्र बसून संवाद साधा, जसं एखाद्या डब्यात जर आपण खूप गोष्टी कोंबल्या तर झाकण लागत नाही, पण जर त्यातल्या काही गोष्टी बाहेर काढल्या तर झाकण लागत... तसच रोजच्या सवयीने आपण आपल्या स्वतःला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो आणि हीच वेळ असते हे जाणून घ्यायची की थोडी एकमेकांना स्पेस देऊया म्हणजे नाविन्य टिकून राहील आणि नवीन नात्याची गरज लागणार नाही... (काही प्रसंगांसाठी ) ( नक्कीच प्रत्येकाची situation वेगळी असतें.) 

आणि ह्या तीन घंटा बहुतांश घरात वाजताताच. एकदा का ह्या तीन घंटा वाजल्या की मग तुमच्या आयुष्यात एक मध्यांतर येतो जिथे तुम्ही परत त्याच उत्साहाने, मान उंच करत एकमेकांना गर्दीत शोधायला सुरावत करता आणि जुन्या आठवणींना उजाळा देता... ही जर सत्य परिस्थिती मुलांसमोर पालकांनी ठेवली तर कदाचित खऱ्या आयुष्यात लग्न हे नाटकाप्रमाणे दोन - तीन अंकात संपणार नाही तर आयुष्यभर सुरू राहील.... 

हे विचार मनात आले आणि तेवढ्यात, "अहो ताई, तुम्हाला समोसा हवाय की वडापाव असा आवाज आला" आणि मध्यांतरा नंतरची घंटा वाजली...... 

*हे सगळं काल्पनिक पण सध्याच्या परिस्थितीबद्दल आहे... 
कुणालाही उद्देशून नाही. 

#NP Arts
18-3-2024
 


Comments

Popular posts from this blog

आई, बाबा आणि भांडण

मोठ्ठा शून्य

The Millennials