चाळिशीतला - दुसरा अंक...
चाळीशीतला - दुसरा अंक...
सध्या मराठी नाटकांना खूप मोठ्या संख्येने गर्दी होतं आहे. बरं आजकाल नाटकं सुद्धा दोन अंकी असतात. फार क्वचित तीन अंकी नाटक होतं असेल. हाऊसफुल चा बोर्ड बऱ्याच नाट्यगृहात पाहायला मिळतो कारण हल्लीच्या नाटकांचे विषय हे प्रामुख्याने सध्याच्या काळाला अनुसरून असतात.
काही महिन्यांपूर्वी अतुल सुभाष ह्यांच्या आत्महत्येने पूर्ण देशाला हलवून सोडलं होतं. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की आपल्या आजूबाजूला सुद्धा १९७०-१९८८ मधले कितीतरी जणं आहेत जे स्वतःला सिद्ध करण्याच्या प्रयत्नात आहेत. काही जणं यशस्वी झाली आहेत, मग ते त्यांच्या करीअर मध्ये असेल किंवा खाजगी आयुष्यात असेल पण असे बरेच जण आहेत ज्यांना अजूनही झुंज द्यावी लागत आहे. स्वतः पेक्षा कमी वयाच्या मुलांना आपला बॉस म्हणून बघणं आणि राजकारण सहन करणे तेही त्यांच्यापेक्षा कमी पगारात, हे कठीण आहे. GenZ ना मिळणारा पगार आणि त्या तुलनेत ह्यांना मिळणारा पगार ह्यामध्ये खूप तफावत आढळते.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे १९७०-१९८८ मधल्या मुलांना नेहमीच तुलनेला सामोरं जावं लागतं. ओळखीतल्या लोकांना हे बोलणं खूप सोपं आहे, की चाळीशी ओलांडली आहे पण ना अजून लग्न झालंय आणि अजून तिची / त्याचा पगार पण खास नाहीये. कमी पडत असेल मेहनत, नशीब पण लागत ना....... पण त्या व्यक्तीच्या जागी उभ राहून बघितलं कि कळत, सोपं नाहीये एवढं असून सुद्धा मनावरचा ताबा मिळवणं. सोपं नाहीये रोज नवीन दिवसासाठी स्वतःला परत उभ करणे.
१९७०-१९८८ मधील मुलांमध्ये जो संयम आहे तो आत्ताच्या Gen Z मध्ये कमी प्रमाणत आहे. आपण सगळेच जणं आपापली पात्र आणि त्याची कथा लिहून आलेलो आहोत. इथे येऊन आपण फक्त त्याचं सादरीकरण करतोय. चाळीशीतल्या मुलांमध्ये फक्त शारीरिक नहींतर मानसिक बदल खूप जास्त प्रमाणात होतं असतात.
आजच्या सोशल मीडियाच्या काळात दुसऱ्यांच्या जीवनशैलीशी तुलना करणे सोपे झाले आहे, पण यामुळे अस्वस्थता आणि असमाधान वाढते. बहुतांश लोकं आर्थिक यश आणि अयश ह्यावरून ठरवतात की मैत्री करायची की नाही करायची.. घराघरात तुलना होणे आणि त्यावरून त्यांच्याशी वागणूक ठरवली जाते.
वास्तवाशी समजून घेणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. ते जमवून घेण्यासाठी काहींना कष्ट घ्यावे लागतात. आपण हे विसरून जातो की पैसा आज आहे उद्या नाही पण परवा परत कमावता येऊ शकतो. माणूस गेला की परत आणू शकत नाही आणि त्या व्यक्तीची जागा कुणाला देऊ पण शकत नाही.
आपल्या आजूबाजूला खूप चाळीशीतले मुलमुली आहेत ज्यांना मानसिक आधाराची नाही तर त्यांच्या मनातलं ऐकून घ्यायची गरज आहे. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पडताना त्यांना जगणं काय आहे हेच विसर पडलाय. पबला जाण, सिगरेट - ड्रिंक्स करणं म्हणजे जगणं ही एक पर्यायी समजूत त्यांनी शोधून काढली आहे. एवढे करून पण तुम्ही स्ट्रेस मधे असाल तर परत "जगणं काय असतं" ते शोधण्याची गरज आहे ना...
ऐंशितल्या मुलांना विचारांचा आणि मनावरचा समतोल राखण्यासाठी स्वतःशीच झुंज द्यावी लागते, कारण पहिला अंक आणि चाळीशीतला दुसरा अंक ह्याची तुलना होऊ शकत नाही. पहिला अंक कधी संपला ते कळत नाही आणि दुसरा अंक सुरू झाल्यावर त्याचा शेवट लिहिण्याची जबाबदारी प्रत्येकाची स्वतःची आहे.
#NehaP
Comments
Post a Comment